Hotels Closed In Dombivli On 28th March: तुम्ही डोंबिवली शहर आणि आजूबाजूच्या परिसरात राहत असाल आणि काही कारणाने हॉटेलमधील खाण्यावर अवलंबून असाल तर उद्याची तयारी तुम्हाला आजच करावी लागणार आहे. यामागील कारण म्हणजे डोंबवलीमधील हॉटेल व्यवसायिकांनी संतापून एक मोठा निर्णय घेतला आहे. शांततेच्या मार्गाने आपली मागणी मांडूनही काही उपयोग होत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांनी एका दिवसाच्या बंदची हाक पुकारली आहे. अनधिकृत ढाब्यांवर खुलेआम पद्धतीने मद्यविक्री होत आहे. या बेकायदेशीर मद्यविक्रीमुळे परवानाधारक हॉटेल मालकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळेच आता या बेकायदेशीर मद्यविक्रीविरुद्ध डोंबिवली शहरातील हॉटेल मालक एकत्र आले आहेत.


ढीम्म प्रशासन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीमधील सर्व हॉटेल गुरुवारी म्हणजेच 28 मार्च रोजी बंद राहणार आहेत. शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बेकायदेशीर ढाब्यांवर मद्यविक्री होते यावरुन वारंवार हॉटेल व्यवसायिक आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून शासकीय स्तरावर तक्रार दाखल करण्यात आल्या. मात्र त्यानंतरही या बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात कारवाई होत नसल्याने अखेर हॉटेल चालकांनी संपाचं हत्यार उपसले आहे. ढीम्म प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्वच हॉटेल चालकांनी गुरुवारी हॉटेल बंदची हाक दिली आहे. या बंदला डोंबिवलीमधील सर्वच हॉटेल चालकांनी पाठिंबा दिला आहे. 


ढाबे चालकांचे बेकायदेशीर धंदे सुरुच


रितसर मार्गाने अधिकृतपणे लाखो रुपये खर्च करुन मद्य विक्रीचा परवाना घेणाऱ्या हॉटेल चालकांना बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या ढाब्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनधिकृत ढाब्यांवर उघडपणे मद्यविक्री केली जात आहे. या ढाबे चालकांकडे मद्यविक्रीचे अधिकृत परवाने नसतानाही ते मद्य विकत असून यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याचा हॉटेल चालकांचा आरोप आहे. याबद्दल अनेकदा तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. रितसर अर्ज, विनंत्यांबरोबर थेट तक्रारींच्या माध्यमातूनही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यानंतरही ढाबा चालकांवर कारवाई होत नसून त्यांचे बेकायदेशीर धंदे सुरुच आहेत.


पर्यायी व्यवस्था पाहण्याशिवाय डोंबिवलीकरांकडे पर्याय नाही


आता केवळ अर्ज विनंत्यांनी प्रशासनाला जाग येणार नसल्याने हॉटेल चालकांनी थेट एकदिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या बंदला डोंबिवलीतील सर्व हॉटेल चालकांनी पाठिंबा दिला असल्याने गुरुवारी डोंबिवलीकरांना घरीच जेवणाचा बेत करावा लागणार आहे. तसेच हॉटेलमधील जेवणावर अवलंबून असलेल्यांची उपासमार होण्याची भीती व्यक्त होत असून त्यांनी गुरुवारपुरती जेवणाची पर्यायी सोय करणं अधिक फायद्याचं ठरेल असं चित्र दिसत आहे.