मुंबई : मुख्यमंत्रीपदासंदर्भात अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये नक्की काय ठरलं यावरुन दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवा वाद सुरु झालाय. प्रत्येकी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावरुन या दोघांच्या बैठकीत काय ठरलं, हे आपल्याला ही माहित नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षातला सत्तासंघर्ष आणखी वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळी फराळाच्या अनौपचारीक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ५०:५० फॉर्म्युल्याच्या चर्चेचा वाद नव्याने रंगला आहे.


लोकसभेच्या वेळी उध्दव ठाकरे यांनी अमित शाहंसमोर नक्की कुठला प्रस्ताव ठेवला हे आपल्याला माहित नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून देण्याचा शब्द शिवसेनेला कधीच दिला नव्हता, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. 


तर दुसरीकडे 2014 प्रमाणे यावेळी शरद पवार भाजपाला बाहेरून पाठिंबा देणार नाही, याची खात्री शिवसेनेला असल्यानं शिवसेना एवढे आक्रमक झाले आहे. पण मीच पुढची पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार हे स्पष्ट आहे, हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. 



यावर शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांची लागलीच प्रतिक्रिया आली. भाजपानं शब्द पाळला नाही असा थेट आरोपच राऊत यांनी केलाय.   


१८ फेब्रुवारी २०१९ ला शहा आणि ठाकरेंनी नक्की काय ठरवलं असेल ते असेल, पण सध्या दोन्ही पक्षाचे नेते दावेप्रतिदावे करत एकमेकांसमोर उभे ठाकलेत. 


३० नोव्हेंबरचा अमित शाह यांचा मुंबई दौरा जवळपास अनिश्चित आहे. तर उद्धव  ठाकरेही यावर काहीही बोलत नाहीत. त्यांनी आमदारांना पुढे करत अडीच वर्षांचा फॉर्मुला ठरला होता, असा मेसेज मीडियापर्यंत पोहोचवला. त्यामुळं आता हेवेदाव्याचं राजकारण युतीत सुरु झालंय. 


त्यात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपांच्या नेत्यांमध्ये होणारी वाटाघाटींची पहिली बैठक रद्द झाली. दरम्यान, बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार असून, त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. म्हणजे त्यानंतरच कुठे शिवसेना-भाजपच्या नव्या सरकारच्या वाटाघाटी सुरू होतील.