मुंबई: शिवसेनेशी युती झाली नाही तरी आम्हाला फरक पडत नाही, अशा डरकाळ्या फोडणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेपुढे टाळीसाठी हात पुढे केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शहा यांनी हिंदुत्वासाठी युती करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. जेणेकरून पुढील निर्णय घेता येतील, असे शहांनी उद्धव यांना सांगितल्याचे कळते. गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड शिवसेना व भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरु असल्याचे समजते. मात्र, नुकत्याच जालना येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्वासाठी शिवसेनेशी युती करायची असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यासाठी लाचारी पत्कारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे शिवसेनेनेही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आजपासून विभागवार पदाधिका-यांच्या आढावा बैठका सुरु झाल्या आहेत. यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. लोकांच्या मनात युती व्हावी, असा विचार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील, असे केसरकर यांनी सांगितले. 


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्या तर राजकीय समीकरणं नक्कीच बदलणार आहेत. पण युतीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. एकीकडे भाजपकडून युतीबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते. मात्र, युतीबाबत भाजपकडून कोणताच प्रस्ताव न आल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. म्हणते आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.