मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर (Sapnil Lonkar) या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येचं पडसाद महाराष्ट्रभर उटमले असून अनेकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभारावरुन टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे नेते अमित ठाकरे यांनीदेखील या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत लोकसेवा आयोगाला सुनावलं आहे. 


मनसे नेते अमित ठाकरे यांची पोस्ट


'एमपीएससी'ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणाऱ्या स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर 'एमपीएससी हे मायाजाल आहे' असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच 'एमपीएससी' परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला 'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा.


मन हेलावून टाकणारं स्वप्निलचं पत्र


MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. 2 वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि 24 वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! असं स्वप्निल लोणकरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.