एकनाथ खडसेंच्या टीकेला अमृता फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाल्या...
समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?,
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नुकतेच अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी एमआयडीसीच्या कथित जमीन व्यवहारावरून देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले होते. मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी केला होता.
मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही - देवेंद्र फडणवीस
खडसे यांच्या या प्रश्नाला अमृता फडणवीस यांनी ट्विटवरून खोचकपणे प्रत्युत्तर दिले. अमृता यांनी म्हटले की, तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत खडसे यांच्या आरोपांवर जाहीरपणे बोलणे टाळले आहे. माझ्यात फार संयम आहे. घरची धुणी मी रस्त्यावर कधीच धूत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना लगावला होता. तसेच एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका वा टिपण्णी करणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.
कन्येची शपथ घेऊन फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती- खडसे
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा दावा केला. तसेच राज्यसभा निवडणुकीवेळीही मला दिल्लीत पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. पण नंतर चार दुसरीच नावे समोर आली, असे खडसे यांनी सांगितले.