प्रशासनाने आपल्यासाठी शहरात योग्य सोयीसुविधा उभ्या कराव्यात अशी प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा असते. पण प्रशासनाने पायाभूत सुविधा उभारल्या असताना त्यांचा योग्य वापर करणं ही जबाबदारी नागरिकांची असते. मात्र अनेक शहरांमध्ये नागरिक आपलं घर स्वच्छ ठेवताना शहर मात्र निर्धास्तपणे खराब करत असतात. मुंबईत तर अनेक ठिकाणी असे बेजबाबदार नागरिक दिसतात. नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर आपण एक नागरिक म्हणून शहराप्रती योग्य ती जबाबदारी पार पाडत आहोत का हा विचार करण्यास तुम्हाला भाग पाडेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया हे फक्त शहरच नव्हे तर देशभरात पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे. मुंबई शहरात आलेला प्रत्येक व्यक्ती गेट-वे ऑफ इंडियाला नक्की भेट देतो. पण याच गेट-वे ऑफ इंडियावर काही नागरिक निर्धास्तपणे समुद्रात निर्माल्याच्या नावाखाली कचरा फेकताना दिसले. एका दक्ष नागरिकाने हा व्हिडीओ शूट केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. यानंतर मुंबई महापालिकेनेही याची दखल घेत दंड ठोठावला आहे. 


व्हिडीओत दिसत आहेत त्यानुसार टॅक्सीतून आलेले 4 ते 5 जण कचऱ्याने भरलेल्या सर्व पिशव्या समुद्रात रिकाम्या करत होते. हे सर्व पाहिल्यानंतर तेथून जाणारे नागरिकही आश्चर्याने पाहत उभे होते. 


आनंद महिंद्रांची नाराजी


उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही एक्सवर व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी जाहीर केली आहे. "हे पाहणं फार वेदनादायी आहे. जर नागरिकांची वृत्ती बदलली नाही तर भौतिक पायाभूत सुविधांमध्ये कितीही सुधारणा शहराच्या जीवनमानात सुधारणा करू शकत नाहीत", असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी या पोस्टमध्ये मुंबई पोलीस आणि पालिका आयुक्तांनाही टॅग केलं होतं. 



10 हजारांचा दंड


नागरिकाने एक्सवर काही लोक समुद्रात पिशव्या भरुन कचरा फेकत असल्याचा व्हिडीओ शेअऱ केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. यानंतर मुंबई पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध घेणं सुरु केलं होतं. 


या व्हिडीओत एक टॅक्सी दिसत होती. या टॅक्सीतूनच हे नागरिक कचरा घेऊन आले होते. पोलिसांनी टॅक्सी नंबरच्या आधारे या बेजबाबदार नागरिकांचा शोध घेतला. यानंतर पालिकेने नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 10 हजारांचा दंड ठोठावला.