कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननात तब्बल 457 पुरातन वस्तू सापडल्या आहेत. यानिमित्तानं प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणाच समोर आल्यात. दुसरीकडं अंबाबाई मंदिर आणि परिसराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय देवस्थान समितीनं घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाचं सध्या उत्खनन सुरू आहे. त्यात जुन्या मूर्ती-वीरगळ, अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस,१३५ दुर्मीळ नाणी, प्राचीन मूर्ती, काचेच्या वस्तू असा पुरातन खजिनाच सापडला आहे. मनकर्णिका कुंडातून काढलेल्या गाळात पुरातन ऐतिहासिक वारसा सापडला आहे.


अंबाबाई मंदिर परिसरात घाटी दरवाजा लगत हे मनकर्णिका कुंड आहे. 1957 मध्ये ही जागा सार्वजनिक बागेसाठी महापालिकेला देण्यात आली. 2020 मध्ये ती जागा देवस्थानच्या ताब्यात आली. देवस्थाननं मनकर्णिका कुंड बाहेर काढण्यासाठी उत्खनन सुरू केलं. या उत्खननातून आणखी अनेक बाबी समोर येतील, असा विश्वास मंदिर अभ्यासकांना आहे.


लवकरच हा खजिना भाविकांना देखील पाहता येणार आहे. दरम्यान, हेमाडपंथी बांधकाम शैली असलेल्या या प्राचीन करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र हे सगळं करताना मंदिराच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. 


आंबाबई मंदिर परिसरात यापूर्वी करण्यात आलेल्या उत्खननात अनेक ऐतिहासिक बाबी समोर आल्या आहेत. आत्ता देखील मनकर्णिका कुंड उत्खननात मौल्यवान वास्तू सापडत आहेत. त्यामुळे आपोआपच मंदिर परिसर  धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाचे आहे हे अधोरेखित होत. आत्ता देवस्थान समितीच्या वतीने केल्या जाणाऱ्या थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट च्या निमित्तानं आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येतील का याबाबत भक्तांमध्ये चांगलं कुतूहल निर्माण झालं आहे.