अंधेरीचा सामना भाजप-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगणार, ठाकरेंविरोधात शिंदे लढणार की भाजप?
एकीकडे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा वाद निवडणूक आयोगात आहे. त्याचवेळी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झालीय.
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीची (Andheri By Election 2022) घोषणा झालीय. शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्यानंतर आमदारकीची ही पहिलीच निवडणूक होतेय. शिंदे-ठाकरेसेना निवडणुकीत आमनेसामने येईल असं वाटत असताना अचानक निवडणुकीत एक ट्विस्ट आलाय. पाहुयात एक रिपोर्ट (andheri by election 2022 bjp or eknath shinde group who will contest against uddhav thackeray group candidate )
एकीकडे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा वाद निवडणूक आयोगात आहे. त्याचवेळी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झालीय. शिंदेंच्या बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे शिंदेसेना इथं ताकद लावेल असं बोललं जातंय. मात्र शिंदे गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. भाजपनं मात्र मुरजी पटेल यांना उमेदवारी घोषित केलीय. भाजपला वाट मोकळी करु देण्यासाठीच शिंदेसेना माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्धाटन रविवारी करण्यात आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचे यावेळी दिसले, असं ट्विट शेलारांनी केलंय. तर ही लटकेंच्या पत्नीच जिंकणार असल्याचा विश्वास जागा ठाकरे गटानं व्यक्त केलाय.
या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णयाचे अधिकार दिलेत पण चिन्हाबाबतचा निर्णय अजूनही आयोग घेऊ शकलेलं नाही. कारण चिन्हाबाबत आयोगात केवळ शिंदे गटाचीच कागदपत्रं सादर झालीयेत. ठाकरे गटाची कागदपत्रं सादर झालेली नाहीत.
शिंदेंनी दिलेली कागदपत्रं आम्हाला मिळावीत, त्यानंतर आम्ही आमची कागदपत्रं सादर करु, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतलीय. या सगळ्या घडामोडींमध्ये अंधेरीची ही पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. सहसा निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेलं चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असतं. त्यामुळे या प्रकरणात आयोग काय भूमिका घेणार, शिवसेनेचं चिन्हं गोठवणार की निवडणुकीपूर्वीच आयोग चिन्हाचा वाद निकालात काढणार हा सवाल आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हाचा सस्पेन्स कायम आहे.