Andheri Fire : कामगार रुग्णालय आगीत ९ जणांचा बळी
अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा बळी गेलाय. आज दुसऱ्या दिवशीही आग.
मुंबई : अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा बळी गेलाय. आगीत होरपळलेल्या आणखी एका महिलेचा आज मृत्यू झाला. शीला मोर्वेकर असं या मयत महिलेचं नाव आहे. सेवन हिल्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज तिचा मृत्यू झाल्यानं आग बळींची संख्या ९ वर पोहोचलीय. दरम्यान, आणखी तीन ते चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दुसऱ्या दिवशीही आग
दरम्यान, कालच्या आगीच्या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयाला दुसऱ्यांदा आग लागली. सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील मीटर बॉक्सला ही आग लागल्याचे सांगण्यात येते. अग्निशामक दलाचे ३ बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.
अंधेरी पूर्वच्या कामगार रुग्णालयाच्या आगीप्रकरणी दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.