Money Laundering Case : अनिल देशमुख ईडीसमोर हजर, परमबीर सिंह कुठे आहेत?
गेल्या चार तासांपासून अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे
मुंबई : 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर राजीनामा द्यावे लागले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अखेर आज ईडीसमोर चौकशीला हजर झाले आहेत. गेल्या चार तासांपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे. सकाळी ११.५० च्या दरम्यान अनिल देशमुख आपल्या वकिलांसोबत ईडी कार्यालयात आले होते.
याआधी ईडीने अनिल देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीने सीबीआयकडे मदत मागितली होती. आज अचानक अनिल देशमुख स्वत: ईडी चौकशीसाठा हजर झाले आहेत.
आज सकाळी अनिल देशमुख यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे.
या टि्वटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्यावर आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. आपल्याला ईडीचं समन्स आल्यानंतर आपण ईडीला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. पण ज्या ज्या वेळेस ईडीचा समन्स आला, त्या त्या वेळेस त्यांना कळवलं की माझी याचिका हायकोर्टात आहे. त्याची सुनवाई सुरु आहे. मी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत ईडीच्या कार्यालयात येईन, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
ईडीने जेव्हा आमच्या घरावर छापे टाकले, तेव्हा माझ्या कुटुंबियांनी, माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं. सीबीआयचं दोनदा समन्स आलं, दोन्ही वेळा माझे स्टेटमेंट दिलं आहे, अजूनही माझी केस सुप्रीम कोर्टात पेंडींग आहे. आज मी स्वत ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालेलो आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्यावर खोटे आरोप केले, पण माझ्यावर आरोप करणार परमबीर सिंह (Param Bir Singh) आज कुठे आहेत. परमबीर सिंह परदेशात पळून गेले अशा प्रकारच्या बातम्या येतायत, ते परमबीर सिंह कुठे आहेत,असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
परमबीर सिंह बेल्जियममध्ये?
एप्रिल महिन्यात ८ दिवसांच्या सुट्टीवर गेलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आजपर्यंत हजर झालेले नाहीत. त्यांना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. अशात काँग्रेस नेत संजय निरुपम यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. परमसिंह बेल्जियममध्ये पोहलेच कसे? असा प्रश्न संजय निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.