आघाडीच्या नेत्यांनी सांभाळून वक्तव्य करावीत, गृहमंत्र्यांचा सल्ला
`भाजपचे नेते गुंडांशी भेट घेतल्यानं चर्चेत येत असतात, त्यांनी अगोदर त्यावर स्पष्टीकरण द्यावं`
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला (karim lala) आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीबद्दल केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट आलेलं दिसतंय. संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून माघार घेतलेली असली तरी राज्यात सत्तेत सहभागी झालेला काँग्रेस पक्ष मात्र यामुळे नाराज झालेला दिसतोय. काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी आपण वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर केलं. परंतु, या दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेतील आणखीन एक भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडीच्या नेत्यांनी सांभाळून वक्तव्य करण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय. 'पंतप्रधान वेगवेगळ्या लोकांना भेटतच असतात आणि राहिली गोष्ट काँग्रेसची तर राष्ट्रवादी काँग्रेसला यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.... भाजपचे नेते गुंडांशी भेट घेतल्यानं चर्चेत येत असतात, त्यांनी अगोदर त्यावर स्पष्टीकरण द्यावं', असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.
संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मी त्यावर गृहमंत्रालयाची बाजू मांडू शकेल. त्यांनी काय म्हटलंय ते ऐकल्यानंतर आणि चौकशीनंतरच मी त्यावर बोलेन, अशी भूमिका गृहमंत्र्यांनी मांडलीय.
राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया
दरम्यान, 'भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही' असा सूचक इशाराच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय. 'संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे होते. त्यावर आमची नाराजी होती, ती आम्ही उद्धव ठाकरे यांना कळवली आहे, आता संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेतलं आहे' असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
दरम्यान, राष्ट्रहित धोक्यात येईल अशा कुणासोबतच काँग्रेसनं संबंध कधीही जोडले नाहीत, असं कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय.
भाजपची आघाडीत 'काडी'
संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर 'काँग्रेस नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का?' असा सवाल उपस्थित करत विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली होती. त्यानंतर, अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या, या आपल्या वक्तव्यावरून माघार जाहीर केलीय. 'काँग्रेसमधल्या आमच्या मित्रांनी दुखावलं जाण्याची गरज नाही. या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन झाली असं त्यांना वाटत असेल, तसंच कुणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं वक्तव्य मागे घेत आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
'पूर्वी अंडरवर्ल्डची चलती होती... तेच ठरवायचे कोणाला काय द्यायचे.. .अनेक राजकीय नेते त्यांच्या इशाऱ्याने वागायचे तसेच मुंबईत सत्ताधारी कोण हवा? याचाही तेच निर्णय घ्यायचे... त्यांची तशी दहशत होती. मात्र, मी त्यावेळीही घाबरत नव्हतो. मी डॉन दाऊद इब्राहिमशीही बोललो आहे, त्याचा फोटो काढला आहे... एव्हढंच नाही, त्याला मी दमदेखील दिला आहे' असंही संजय राऊत यांनी आपल्या जाहीर मुलाखतीत म्हटलं होतं.