मंत्रालयात तरूण शेतक-याला पकडले विषाच्या बाटलीसह
धर्मा पाटील यांच्या मृत्यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयात याच प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होता होता टळली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : धर्मा पाटील यांच्या मृत्यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयात याच प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होता होता टळली आहे.
समस्यांनी ग्रस्त असलेला सोलापूर जिल्ह्यातील मारूती धावरे हा तरूण शेतकरी विषाची बाटली घेउनच मंत्रालयात आला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मारूतीला गेटवरच अडविण्यात आले. यामुळे कोणताही अनावस्था प्रसंग घडला नाही.
सोलापूर जिल्हयातल्या अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावचा २८ वर्षांचा तरूण शेतकरी मारूती सदाशिव धावरे याची उसाची शेती आहे. मात्र त्यात निर्माण होणा-या अडचणींमुळे त्रस्त होउन मारूतीने आपले उभे पीक जाळून टाकले. समस्यांना कंटाळून तो मंत्रालयात विषाची बाटलीच घेउनच आला होता.
टायगर नावाच्या किटकनाशकाची ही बाटली होती. मात्र धर्म पाटील प्रकरणानंतर मंत्रालयातील पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जेजे गेटवर पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याकडे विषाची बाटली असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला मंत्रालयात प्रवेश करण्यापासून रोखले. यामुळे पुढचा अनावस्था प्रसंग टळला.