मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बुधवारी सकाळी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बहुजन क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा रेलरोको करण्यात आला. त्यांनी ट्रॅकवर उतरत CAA विरोधी घोषणा देत वाहतूक रोखून धरली. यानंतर पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ट्रॅकवरून हटवले. 



मात्र, दरम्यानच्या काळात धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे आंदोलकांना ट्रॅकवरून हटवल्यानंतरही वाहतूक विस्कळीतच आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे सकाळच्या वेळेत कार्यालय गाठण्याची घाई असलेल्या कर्मचाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.