मुंबई : शिवसेना-भाजप युतीतले नाराज राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज दुपारी ३ वाजता सह्याद्री अतीथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर नाराज अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी दंड धोपटले आहेत. काल त्यांच्या घरी झालेल्या बैठकी नंतरही अर्जुन खोतकरांची नाराजी कायम आहे. मी अजूनही मैदानातच असून निवडणुकीचं रणांगण सोडलं नसल्याचं अर्जुन खोतकर यांची भूमिका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीला रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली. आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुखांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली.


दरम्यान अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील. उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी काल दिली होती. जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतली नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं. तर खोतकर आणि माझ्यातील वाद मिटले असून दोघांचं मनोमिलन झाल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली होती.