असल्फा येथून गटारात वाहून गेलेल्या महिलेच्या घटनेला नवं वळण
हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य
मुंबई : घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शितल भानुशाली ही ३२ वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना समोर आली. आज पहाटे ३ वाजता सदर महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्र किनारी आढळला. आता या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागताना दिसत आहे.
असल्फा ते हाजीअली दरम्यान जवळपास २० ते २२ किमी चे अंतर आहे.महापालिकेच्या अधिका-यांकडून मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या लांब अंतरापर्यंत जाणे शक्य नाही असे सांगितले जात आहे. शिवाय, महापालिकेनं पर्जन्य जल वाहिन्या , गटारे येथुन वाहणा-या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या, ग्रील्स लावले आहेत. असल्फाच्या पुढे साकीनाका येथेही लावलेल्या ग्रील्सच्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम समुद्रकिनारी येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते.
त्यामुळे तब्बल २० ते २२ किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी आजुबाजूचे सिसीटिव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतायेत का हे पाहिले जात आहे. या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.
पालिकेकडून चौकशी
दरम्यान या प्रकरणाची मुंबई महापालिका चौकशी करणार आहे. उपायुक्तांना १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी दिले आहेत.
दागिन्यांवरुन ओळख
शीतलच्या घरच्यांना तिचे दागिने आणि कापड्यांवरून ओळख पटली. गटाराचे झाकण पावसाने उघडले असावे आणि त्यातून ही महिला वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
अशाप्रकारे गटारातून वाहून जाऊन अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. गटारावर बसवलेली झाकणे ही पाण्याच्या जोराने उघडतात आणि त्यात असा अपघात घडतोय. शीतल भानुशाली ही असल्फा येथील चाळीत राहत असून दळण आणायला गेली होती त्यानानंतर ती घरीच परतलीच नाही.