मुंबई : Ashray Yojna Scam | महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष आता अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याचं कारण म्हणजे कोश्यारी यांनी मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत केली होती. यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील तणाव वाढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


मुंबई महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्यासाठी आश्रय योजना आणली होती. या कामांसाठी 678 कोटींच्या निधीचा महापालिकेचा अंदाज होता. मात्र कंत्राटदारांना 1 हजार 844 कोटी रुपयांचे काम दिले.


सेना-भाजप संघर्ष विकोपाला


  •  येत्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना - भाजप यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे.  

  •  227 नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 94, तर भाजपचे 84 नगरसेवक आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे. 

  •  महाविकास आघाडीने मुंबई पालिकेतील नगरसेवक संख्या 236 केली आहे


 
परिवहन विभागातील पदोन्नतीचीही चौकशी


याआधीही राज्यपालांनी भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.