मुंबई : सातऱ्याचे अभिजीत बिचुकले मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून लढणार आहेत. याआधी बिचुकले यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. बिचुकले यांनी वरळीतून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. आदित्य यांच्याविरोधात मीच निवडून येणार असा विश्वास बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ बिचुकले यांनाच आपण घाबरतो असे मिश्किल विधान उदयनराजे भोसले यांनी केले होते. उदयनराजेंना आपण मोठ्या मताधिक्याने हरवू असेही ते म्हणत असत. दुसरीकडे शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी वरळी हा सुरक्षित मतदारसंघ शोधला आहे. याठिकाणी आदित्य यांना कोणीही मोठा विरोधक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना शिवसेनेने आपल्या गोटात घेऊन आदित्य यांचा विजय आधीच सुखकर केला आहे. इतर कोणत्याही पक्षाने मोठा उमेदवार इथे न दिल्याने आदित्य यांचा मोठा मातधिक्याने विजय होणार हे निश्चित मानले जात आहे. आता अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. 



अभिजीत बिचुकले यांच्याव्यतिरिक्त आदित्य ठाकरेंविरोधात अजून कुठल्याच पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाही. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 


तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात उतरल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अद्याप इथे राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच बहुजन वंचितने उमेदवार दिलेला नाही. आज शेवटचा दिवस असून बिचुकले हे अर्ज पुन्हा भरून चर्चेत आले आहेत.