`या` मतदारसंघात एमआयएमचा काँग्रेसला पाठींबा, भाजपासमोर आव्हान
एमआयएमने पाठींबा दिल्यामुळे मतांचे विभाजन होणार नसून अधिक मतांनी विजय होऊ असा विश्वास
गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि माजी अध्यक्ष संजय निरूपम दोघांनीही प्रचाराकडे पाठ फिरवल्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर जाताना दिसत आहे. पण दुसरीकडे मालाडमध्ये काँग्रेसने भाजपासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. यामध्ये काँग्रेसला एमआयएमची देखील साथ मिळत आहे. मालाड विधानसभेत एमआयएमचे उमेदवार इस्लाम शेख यांनी काँग्रेसचे उमेदवार असलम शेख यांना मालवणीत आयोजित एका सभेत पाठींबा जाहीर केला आहे.
यामुळे मालाड विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा दणका बसू शकतो. उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात मालाड विधानसभा ही गेली 10 वर्ष काँग्रेसकडे होती. यामुळे यंदा मालाड विधानसभा भाजपाकडे खेचण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपने केला.
भाजपाने कांदिवली पूर्वचे काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्यात एमआयएमने मुस्लिमबहुल भाग असलेल्या मालाड मतदारसंघात आपला उमेदवार दिला.
त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली होती. परंतु आता एमआयएमने पाठींबा दिल्यामुळे मतांचे विभाजन होणार नसून अधिक मतांनी विजय होऊ असा विश्वास अस्लम शेख यांनी केला.