कुर्ल्यातील पोलिसांवरील हल्ल्यामागे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हात- नवाब मलिक
निवडणुकीच्या काळात गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात पद्धतशीरपणे लोकांना चिथावणी दिली जात होती.
मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात मंगळवारी एका अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेत पाच पोलीस जखमी झाले असून त्यापैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. कुर्ला येथे राहणाऱ्या पांचाराम रिठाडिया यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नसल्याने पांचाराम रिठाडिया यांनी आत्महत्या केली होती.
आज त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला हजारो लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी जमाव संतप्त झाला आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली.
या घटनेसाठी भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात पद्धतशीरपणे लोकांना चिथावणी दिली जात होती. भाजपचे स्थानिक नेते हे राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे आजचा प्रसंग घडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडूनही तपासात चालढकल झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपह्त मुलीच्या वडिलांना धमक्या येत होत्या. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पोलीसही निवडणूक असल्यामुळे कामात व्यग्र होते. त्यामुळे त्यांना या प्रकरणाच्या तपासासाठी वेळ मिळाला नाही. परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही बाब लक्षात न घेता लोकांची माथी भडकवली. त्यामुळे आता या प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषींना शासन झाले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.