राज ठाकरे यांना अटक होणार? औरंगाबाद पोलीस मुंबईकडे रवाना
कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी कठोर पावलं उचला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आलीयत. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये (Aurangabad Police) हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एफआयआरमध्ये (FIR) राज ठाकरेंना आरोपी नंबर एक करण्यात आलंय
राज ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद पोलीस मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन ते तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या टीममध्ये सहभाग असल्याची माहिती आहे.
कारवाईचा निर्णय 'वर्षा'वर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वर्षावर झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse-Patil) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. संपूर्ण राज ठाकरे प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालय (CMO) लक्ष ठेवून होतं, असं सूत्रांनी सांगितलं.
कारवाईचा निर्णय कसा झाला?
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई कशी झाली, याबाबत नवीन माहिती हाती समोर आली आहे. त्यानुसार तब्बल 5 तास पोलिसांनी राज ठाकरेंचं सुमारे 45 मिनिटांचं भाषण ऐकलं. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालंय का, हे तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त अपर्णा गितेंनी सायबर शाखेत तब्बल 5 वेळा काळजीपूर्वक हे भाषण ऐकलं. तसंच त्यांनी गृह खात्याला अहवाल पाठवून दिला. त्यानंतर राज ठाकरेंवर कारवाईचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
काही अटी शर्तींवर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या अटींचं पालन झालं नाही त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.