मुंबई : पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या धर्तीवर आता साध्या लोकलमध्येही ऑटोमॅटिक क्लोजिंग डोअर्स अर्थात स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर रेल्वेकडून सिमन्स लोकलच्या तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले असून याची चाचणी पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाचणी यशस्वी झाल्यानंतरच टप्याटप्याने उपनगरीय  साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजे लावण्यात येणार आहेत. दरवाजा बंद होणाऱ्या डब्यांमध्ये साध्या लोकलच्या प्रथम श्रेणी, लगेज, दिव्यांग आणि एक महिला डब्याचा  समावेश आहे. विशेष म्हणजे लोकलचे दरवाजे उघडताना आणि बंद होताना लाईट चालू होऊन प्रवाशांना तशा सूचना मिळणार आहेत.


पश्चिम रेल्वे आता लोकलला एसी डबे जोडणार आहे. १२ डब्यांच्या लोकलमध्ये ३ डबे एसी असतील, तर १५ डब्यांच्या लोकलमध्ये ६ डबे एसी असणार आहेत. येणाऱ्या उन्हाळ्यात या सेमी एसी ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावतील असा विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे.



एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेनं हा उपक्रम हाती घेतलाय. या एसी डब्याचं तिकीट सध्य़ाच्या फर्स्ट क्लासपेक्षा दीडपट जास्त असेल असं सांगण्यात येतं आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करता या ट्रेन चालवण्याची पश्चिम रेल्वेची योजना आहे.


पश्चिम रेल्वेवर सध्या एसी लोकल धावत आहे. या लोकलचे सगळेच डबे एसी आहेत. याच धर्तीवर मध्य रेल्वेवरही एसी लोकल दाखल झाली आहे, पण या लोकलची सेवा अजून प्रवाशांसाठी सुरु झालेली नाही. चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यात या लोकलची निर्मिती झाली आहे.