Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: "श्रीराम जन्मभूमी सोहळा हा रामाचा कमी, मोदी यांचाच जास्त होता. मंदिर श्रीरामाचे की मोदींचे होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. म्हणूनच भाजपमुक्त श्रीरामाची हाक उद्धव ठाकरे यांनी नाशकात दिली व ती योग्यच आहे," असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 22 तारखेला नाशिकमधील काळाराम मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाचा संदर्भ देत ठाकरे गटाने ही टीका केली आहे.


हनुमानाच्या शेपटीप्रमाणे शिंदेंच्या दाढीस आग लागली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"खऱ्या शिवसेनेचे भव्य महाअधिवेशन देवभूमी नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर पार पडले. त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा-आरती केली. पाठोपाठ गोदावरी तटावर जाऊन हजारो रामभक्त शिवसैनिकांसह महाआरती करून प्रभू श्रीरामाचरणी श्रद्धासुमने अर्पण केली. त्याचा राग महाराष्ट्राचे मिंधे मुख्यमंत्री व त्यांच्या बगलबच्चांना आला आहे. राग इतका की, हनुमानाच्या शेपटीप्रमाणे त्यांच्या दाढीस आग लागली. हनुमानाच्या शेपटीस आग लावल्याने रावणाची लंका जळाली. इथे मिंधे स्वतःच स्वतःचा जळफळाट करून घेत आहेत. नाशकातील सर्व सोहळ्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा हा झटका आहे. मुख्यमंत्री मिंधे वगैरे म्हणतात, ‘‘लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही, त्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते.’’ मिंधे यांचे हे विधान स्वतःलाच चपखल बसते. ‘ईडी’ वगैरे तपास यंत्रणांच्या भयाने हे लबाड लांडगे भाजपच्या कळपात शिरले व आता ते हिंदुत्वाचे ढोंग आणीत आहेत. अशा लबाडांनी शिवसेनेचे काळीज तपासण्यापेक्षा स्वतःच्या भविष्याची काळजी वाहावी. पळपुट्यांनी वाघ, सिंहाची काळजी करावी म्हणजे बिळात लपलेल्या उंदरांनी कोल्हेकुई करण्यासारखे आहे," असं म्हणत 'सामना'मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आलं आहे.


श्रद्धेचा राजकीय अपहार होणार असेल तर...


"महाराष्ट्रातील अनेक मंदिरे ही बडवे, दलाल वगैरेंच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आंदोलने झाली आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलित, बहुजनांना प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. आता अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भाजपच्या बडव्यांच्या ताब्यात जाऊन तेथे श्रद्धेचा राजकीय अपहार होणार असेल तर प्रभू रामांना भाजपमुक्त करावे लागेल. जे भाजपला मत देतील त्यांना अयोध्येतील रामलल्लांचे मोफत दर्शन करण्याची मुक्ताफळे याआधी भाजपच्या नेत्यांनी उधळलीच आहेत. त्यामुळे श्रीरामांच्या अस्तित्वाची भक्तांना चिंता वाटते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


अजित पवारांना भाजपची ही धार्मिक ढोंगबाजी अजिबात मान्य नसावी


"श्रद्धेचा हा बाजार भरवून भाजप लोकसभा निवडणुकांच्या तयारीस लागला आहे व ते चित्र महाराष्ट्रातदेखील दिसत आहे. महाराष्ट्रात प्राणप्रतिष्ठेच्या शुभदिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय करत होते? मुख्यमंत्री मिंधे हे पूजा वगैरे करीत होते. ‘पाव’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिवसभर टाळ, भजनात दंग असल्याचे दिसले, पण अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री या सोहळ्यात व श्रद्धा कार्यक्रमात कोठेच दिसले नाहीत. ना त्यांनी पूजा केली, ना आरतीची थाळी फिरवली. संपूर्ण राज्य राम भजनात दंग असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मोदींच्या या धार्मिक अजेंड्यापासून लांबच राहिले. ते त्या दिवशी कोठे दिसलेच नाहीत, की त्यांनीही मोदीमुक्त रामाचे भजन खासगीत सुरू केले आहे? श्रीराम भक्तीच्या अशा विविध तऱ्हा राज्यात दिसल्या. एकतर उपमुख्यमंत्री पवार यांना भाजपची ही धार्मिक ढोंगबाजी अजिबात मान्य नसावी किंवा अजित पवार हे अद्यापि भाजपच्या प्रवाहात नीट सामील होऊ शकलेले नसावेत. यावर मुख्यमंत्री मिंधे किंवा फडणवीसांचे काय म्हणणे आहे?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.


शेतकरी आत्महत्येवर राममंदिराचा सोहळा हा तोडगा आहे काय?


"देशात सध्या अनेक प्रश्नांनी उसळी मारली आहे. रामाचे मंदिर झाले, आता देशाच्या व लोकांच्या कामाचे बोला, पण महाराष्ट्राचे किंवा देशाचे मोदी सरकार कामाचे बोलायला तयार नाही. अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी झुंबड उडाली आहे यातच भाजप खूश आहे. लाखोंचे जत्थे रामजन्मभूमीच्या दिशेने निघाले आहेत व हे सर्वसामान्य भक्त आहेत. त्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांचा भरणा जास्त आहे. रामाचे दर्शन झाले तरी त्यांच्या हातांना काम, शेतकऱ्यांच्या मालास भाव हा सरकारलाच द्यावा लागेल. महाराष्ट्रातील आमदारांना ‘खोके’ मिळतात; पण कांदा, कापूस, सोयाबीन उत्पादकांना भाव मिळत नाही. दूध उत्पादकांचे वांधेच आहेत. उद्योगपतींच्या कर्जाची रोज माफी होते. अजित पवारांचा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळाही माफ झाला, पण पाच-दहा हजारांच्या कर्जापायी शेतकऱ्यांच्या घरांवर जप्तीची कारवाई सुरू आहे. प्रभू श्रीरामाच्या झुंबड गर्दी दर्शनाने या कारवाया थांबणार असतील तर मोदी वगैरे रामभक्तांनी तसे सांगावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोजच होत आहेत. त्यावर राममंदिराचा सोहळा हा तोडगा आहे काय?" असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला आहे.


रामाचे गुदमरणे थांबवायला हवे


"महाराष्ट्रात भ्रष्टाचार ताडामाडासारखा वाढला आहे. श्रीरामास हे मान्य होणार नाही, पण भ्रष्ट हात श्रीरामांच्या भजनात टाळ कुटत बसले आहेत. महाराष्ट्रातले हे ढोंग विचित्र आहे. लबाड लांडग्यांचे राज्य महाराष्ट्रात आहे व राष्ट्रवादाचे कातडे ओढलेले लोक देशावर राज्य करीत आहेत. श्रीराम त्यांच्या कात्रीत सापडला आहे. अयोध्येची पुढची लढाई ही भाजपमुक्त श्रीरामासाठीच करावी लागेल असे चित्र आहे. रामासाठी सामान्यांनी बलिदान दिले. त्या रामाची सूत्रे ढोंगी व लबाड लांडग्यांच्या हाती गेली. मंदिरे भ्रष्टाचारमुक्त व ढोंगमुक्त हवीत. अयोध्येत जे सुरू आहे त्याकडे आणि देव नव्या बडव्यांच्या ताब्यात गेले आहेत का याकडे बारकाईने पाहावे लागेल. रामाचे गुदमरणे भक्तांनीच थांबवायला हवे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.