विधानसभा : बिनविरोध अध्यक्षपद निवडीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया
शेतकऱ्यांकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं
मुंबई : आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. मात्र, परंपरेप्रमाणे अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाना पटोले यांच्यासमोर भाजपचे किसन कथोरे यांना उभं करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी भाजप पक्षाने आपला स्वभाव बदलत काँग्रेसच्या नाना पटोलेंना बिनविरोध निवडून दिलं आहे. नाना पटोले हे शेतकरी नेते असून शेतकरी संघटनेत त्यांचा उल्लेखनीय पुढाकार होता. त्यामुळे त्यांच्या निवडीनंतर शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
25 वर्ष भाजपचे मित्र असणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. भाजपने विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नाराजगी दाखवली होती. पण दुसऱ्या दिवशी भाजपने आपला आक्रमक स्वभाव मागे घेतल्याचं दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेऊन त्यांनी विधानसभेची परंपरा सुरू ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी का होईना चांगला हातभार लावला आहे. आज विरोध न करता नाना पटोलेंची अध्यक्ष पदावर निवड झाली आहे. आता सगळ्या गोष्टी स्थिर झाल्यावर सगळ्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी वाट बघत असल्याचं आमदार आणि प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट मोदींसमोर मांडले होते. नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच कट्टर भाजपविरोधी असलेले नाना पटोले आता विधानसभा अध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता विधानसभेत नाना पटोले कसे कामकाज सांभाळतात याकडे सगळ्यांच लक्ष राहिल.