चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : पत्नीचं प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय आल्यानं पतीने तिच्यावर जीवघेणा हल्ला करुन स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये (Badlapur Crime) घडला आहे. पत्नीवर जीवघेणा हल्ला करून पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात (Badlapur Police) पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर पूर्वेच्या यादव नगर परिसरात राज हाईट्स गृहसंकुलात सुनील अहिरे हे त्यांची आणि दोन मुलांसह राहत होते. पत्नीचं बाहेर प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय सुनीलला होता. त्यामुळे सुनीलचे त्याच्या पत्नीसोबत सातत्याने वाद होत होते. सुनील राजकीय पक्षात कार्यरत असल्यानं आपल्याच पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यासोबत पत्नीचे संबंध असल्याचा सुनीलला संशय होता. याच कारणामुळे त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचं. 


काही दिवसांपूर्वी सुनीलने दादर रेल्वे स्थानकात सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी इतरांनी त्याचे प्राण वाचवले होते. शनिवारी रात्री सुद्धा सुनील आणि त्याच्या पत्नीचे जोरदार भांडण झाले. यावेळी सुनीलने पत्नीच्या डोक्यात काठीनं मारहाण केली. या मारहाणीत त्याची पत्नी खाली पडली. सुनीलची पत्नी बेशुद्ध पडली होती, मात्र त्याला वाटलं की मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यानं स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. 


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. सुनीलच्या पत्नीवर सध्या बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिलीय.


शुल्लक कारणावरुन बदलापुरात मित्राची हत्या


मद्यधुंद अवस्थेत किरकोळ भांडणानंतर झालेल्या वादामध्ये आपल्या 28 वर्षीय मित्राची हत्या करून त्याचा मृतदेह झुडपात फेकल्याच्या आरोपाखाली एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बदलापूर पोलिसांनी सोमवारी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत प्रसाद जिंजूरकर हा काही महिन्यांपासून बेरोजगार होता. तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहायचा आणि मित्रांसोबत पार्टी करायला जायचा. आरोपी समसुल हक गुलाम करीम (34) याची जिंजूरकरशी मैत्री होती.


"आरोपी आणि मयत दोघेही दारूच्या नशेत होते आणि मयत आरोपीच्या फोनवर बराच वेळ बोलत असल्याने त्यांच्यात जोरदार भांडण झाले. आरोपी चिडला आणि त्यातून भांडण आणि नंतर खून झाला. आरोपी त्याच दिवशी पत्नी आणि मुलांना घेऊन आंध्र प्रदेशातील त्याच्या गावी गेला होता. तो कल्याणला कामानिमित्त येत असताना आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं. अटकेनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली," अशी माहिती पोलिसांनी दिली.