मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली. हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, असे त्यांनी उच्च न्यायालयाला कळवले. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात त्यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. उद्धवने बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपली, असे याचिकेत म्हटले होते. 


बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र, त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव यांच्यासमोर याविषयी वाच्यता करू नको, असे त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे २०११ मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते, असा जयदेव यांचा दावा होता. 


त्यानंतर या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी सुरू होती. याप्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती.


उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात प्रोबेट दाखल करून मृत्यूपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर थेट सुनावणी करू नये, आम्हाला त्याची माहिती द्यावी, अशी विनंती कोर्टाला केली होती. मात्र, आता जयदेव यांनी माघार घेतल्याने हा वाद कायमचा संपुष्टात आला आहे.