मुंबई : सरकार कोणाचंही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असतो तो ठाकरे आणि पवार घराण्याचा. या घराण्यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या रुपाने हे तिसऱ्या पिढीचे वारसदार पहिल्यांदाच आमदार झालेत. ते चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार. एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा तर दुसरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा नातू. आता आमदार म्हणून दोघेही पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेत. त्यामुळे विधानसभेत त्यांचा आवाज पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत रिमोट कंट्रोल चालवणाऱ्या ठाकरे घराण्यातला आदित्य पहिल्यांदाच वरळीतून निवडणूक लढवायला मैदानात उतरला. हीच ती वेळ म्हणत नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आदित्यने जाहीर केला. 'जनआशीर्वाद यात्रे'च्या माध्यमातून शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून आदित्यला प्रोजेक्ट करण्यात आले. वरळीतून आदित्य ठाकरेंचा विजयी झाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. आमदारकीचे स्वप्न साकार झाले. पण मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार होईल का, याची उत्सुकता आता तमाम शिवसैनिकांना आहे.



 
दुसरीकडे कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार देखील पहिल्यांदाच आमदार म्हणून विजयी झालेत. आजोबा शरद पवारांच्या तालमीत वाढलेला आणि वावरणाऱ्या रोहित पवारांनी आपल्या वक्तृत्वाने आधीच छाप पाडली आहे. मतदारसंघ कसा बांधायचा, याच बाळकडू थेट पवार आजोबांकडूनच त्यांना मिळाले आहे. आजोबांनी पावसात भिजून भाषण केल्यानंतर रोहितनं देखील तोच कित्ता गिरवला. 


आता विधानसभेत काका अजित पवारांसोबत बसण्याची संधी रोहित पवारांना मिळणार आहे. आजोबांच्या सावलीत तयार झालेल्या रोहितला अजितकाकाच्या अनुभवाची साथ मिळणार आहे. त्यामुळं 'एक से भले दो पवार' विधानसभा गाजवणार आहेत. या संधीचं रोहित पवार सोनं करणार का, याची उत्सूकता तमाम महाराष्ट्राला आहे.