मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळाने १०० कोटींची तरतूद करण्याला मंगळवारी मान्यता दिली. त्याचवेळी या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे. स्मारक तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) देण्यात आली आहे. एमएमआरडीए हा खर्च करणार असून, नंतर सरकार ही रक्कम एमएमआरडीएला देणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची उद्या, बुधवारी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे संकेत यापूर्वी दिले आहेत. तर भाजपनेही युती नाही झाली तरी स्वतंत्रपणे लढण्यास आमचा पक्ष समर्थ असल्याचे म्हटले आहे. तरीही या दोन्ही पक्षांची युती झाली नाही तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवसेनेशी युती होण्यासाठी भाजपचे काही नेते प्रयत्नशील आहेत. दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तरीही युतीसाठी शिवसेनेची मनधरणी करण्यासाठीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय भाजपने उचलून धरला असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या स्मारकासाठी तातडीने १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.


दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी काही दिवसांपूर्वीच महापौर बंगला रिकामा करण्यात आला होता. येथील वस्तू राणीच्या बागेतील निवासस्थानामध्ये नेण्यात आल्या होत्या. या स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईला येण्याची शक्यता आहे. पण याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम मार्गी लागल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युती होईल का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.