एकमेकांची थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी भक्कम होईल- बाळासाहेब थोरात
सरकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभाजनाचा प्रस्ताव परस्पर तयार केल्यामुळे अशोक चव्हाण नाराज झाले होते.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीमुळे महाविकासआघाडीत कुरबुरींचे सत्र अजूनही सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीत नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले. मी अशोक चव्हाण यांना भेटलो, यामध्ये काहीही नवीन नाही. आमच्या भेटी होतच असतात. तसेच अशोक चव्हाण यांच्या खातेविभाजनचा निर्णय एकमताने घेतला जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
सरकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभाजनाचा प्रस्ताव परस्पर तयार केल्यामुळे अशोक चव्हाण नाराज झाले होते. मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याची नाराजी चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन बोलून दाखवली होती. त्यामुळे महाविकासआघाडीत नवे नाराजीनाट्य सुरु झाले, अशी चर्चा होती.
मात्र, बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त फेटाळून लावले. महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी अधिक भक्कम होईल. सर्व कामे नीट पार पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्त्या आदी मुद्द्यांवरून महाविकासआघाडीतील पक्ष आमनेसामने आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून महाविकासआघाडी सरकारच्या स्थैर्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सातत्याने पुढाकार घेऊन आतापर्यंत या वादांवर पडदा टाकण्याचे काम केले आहे.