शस्त्रांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या `फ्लिपकार्ट`वर बंदीची मागणी
अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे.
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाल्याने फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी, चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी सुमारे २८ शस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचं उघड झालंय. पोलिसांना वेळीच याचा सुगावा लागला व पुढचा अनर्थ टळला असला तरी अशा प्रकारे खुलेआम शस्त्र खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतील तर ते घातक आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्री करणाऱ्या वेबसाईट्सवर सरकारने तातडीने बंदी घालण्याची गरज आहे.
अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा शस्त्रसाठा कशासाठी मागवण्यात आला होता? त्याचा दंगलीशी काही संबंध आहे का? शस्त्र खरेदीत आणखी कोण-कोण गुंतले आहेत? याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.