मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी जमल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विनय दुबे याने चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारांना लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणीही १८ तारखेला जमा होण्याचा आवाहन केले होते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, वांद्रा  येथे अचनाक गर्दी झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. तो रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आणि कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. असे असताना समाजमाध्यमातून गावी जाण्याचे आवाहन विनय दुबे याने केले. त्यानंतर वांद्र येथे मोठी गर्दी उसळली होती. संचारबंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विनय दुबे विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला नवी मुंबईत ताब्यात घेण्यात आले.


वांद्र रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी झाल्याच्या घटनेनंतर आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे टिळकनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आलेत. तर चुनाभट्टी, नेहरूनगर, विनोबा भावेनगर या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. दरम्यान,वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबे याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.