कसा असणार बीडीडीकरांचा नवा फ्लॅट?
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प
मुंबई : जवळजवळ 25 वर्षांपासून रखडलेला बीडीडी चाळींचा पूर्णविकास आता दृष्टी क्षेपात आला आहे. 100 वर्षाहून अधिक जुन्या असणाऱ्या या बीडीडी चाळीत तीन तीन पिढ्यांपासून राहणाऱ्या येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातोय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतल्या पूर्णविकास इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.बीडीडी मधील राहिवाश्यांना 500 स्वेअर फिटचं घर मोफत मिळणार आहे
वरळीत हा पूर्णविकास प्रकल्प 36 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असं गृहनिर्माण मंत्र्यांनी जाहीर केले आहे. या पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बीडीडीकरांच्या नव्या घरासंदर्भात सविस्तर
वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसनातून 9 हजार 689 नवीन घरं ( निवासी 9394 + अनिवासी 295 ) बांधण्यात येणार आहेत.
या प्रकल्पात ग्राऊंड फ्लोअर धरुन 40 मजल्यांच्या 33 नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत. तर रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे.
प्रत्येक घरात 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहेत. खिडक्यांकरिता पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये 3 पॅसेंजर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट व 1 फायर लिफ्टची सुविधा असणार आहे.
प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + 6 मजली पोडियम पार्किंग व दोन प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंप रोधक असणार आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. आता वर्षानुवर्षे हक्काच्या घराची प्रतीक्षा असलेल्या राहिवाशांना लवकच घरांच्या चाव्या मिळणार असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाच वातावरण आहे.