मुंबई : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूक लक्षात घेता पालिका शाळांमधील पहिल्या 25 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी पालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्या अर्थसंकल्पातच ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मेडिकल, इंजिनिअरिंगची फी मुंबई महापालिका भरणार आहे. तसेच, तांत्रिक आणि व्यावसायिक पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी देखील पालिका भरणार आहे.


दहावीत गुणवंत झालेले विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण होऊन मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छित असतील तर त्या विद्यार्थ्यांचा खर्च पालिका उचलणार आहे. यासाठी बजेटमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.


2020 मध्ये दहावी पास झालेले विद्यार्थी यावर्षी बारावी उत्तीर्ण होतील. या विद्यार्थ्यांपासून हा उपक्रम लागू होणार आहे. पालिका शाळांमध्ये पहिल्या 25 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. शिक्षणाच्या स्पर्धेत पालिका शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.


दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. अशातच मुंबई महापालिकेने शाळांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, चिंताजनक परिस्थिती नाही त्यामुळे पालिका शाळा 13 जूनला सुरू होणार आहेत.


13 जूनला पालिका शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच, गरज भासल्यास पालिका शाळेतच लसीकरण कॅम्प आयोजित करणार आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.