स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई :  नवी मुंबईत स्त्यावरच गांजा विकला जात आहे. झोपटपट्टीतील भिकारी गांजाची विक्री करत( beggars sell drugs in Navi Mumbai ) आहेत. नशेच्या व्यापा-यांनी नवी मुंबईला विळखा घातलाआहे. त्याचा पर्दाफाश करणारं स्टिंग ऑपरेशन झी २४ तासनं(Zee 24 taas sting operation) केले आहे. भिकाऱ्यांच्या मार्फत ड्रग्ज विक्रीचे मोठं रॅकेट नवी मुंबईत चालवलं जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरु आहे. अगदी 100, 200 रूपयात गांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, रबाळे तसंच दिघा भागात भिका-यांमार्फत या अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे. 


स्टिंग ऑपरेशन केलेल्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हा नशेचा व्यापार सुरू आहे याचा  पर्दाफाश करण्यात आला आहे. नकली ग्राहक बनलेल्या एका  तरूणाने रस्त्यावर बसलेल्या एका भिकारी महिलेकडे गांजा मागितला. 200 रूपये दिल्यावर ती भिकारी महिला त्याला गांजाचं पाकिट देते. नवी मुंबईच्या शहरी भागातील तसंच एमआयडीसी परिसरातील झोपडपट्ट्या या नशेच्या बाजाराचं प्रमुख केंद्र बनल्या आहेत. 


विशेष म्हणजे नवी मुंबईसारख्या सुशिक्षित, सधन भागात नशेचा बाजार सुरू असताना पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहेत. थातूर मातूर कारवाईपलिकडे पोलिसांकडून कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे नशेच्या बाजाराला खाकीचाही वरदस्त आहे का? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.