मुंबई - बेस्ट संपाचा तिढा सोडविण्यात अपयशी ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी फोनवरून चर्चा झाली. बेस्ट संपात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यात मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेला पुरते अपयश आले आहे. एकीकडे बेस्टच्या संपामुळे मुंबईतील सामान्य चाकरमाने वेठीला धरले गेले आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणी नुसत्याच चर्चेच्या फेर होत असून, संप मागे घेण्याची घोषणा होत नसल्यामुळे नाराजी वाढते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतल्यानंतरही सुमारे ३२ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. याबाबत संपकरी बेस्ट कृती समिती आणि उच्च न्यायालयाने नेमलेली राज्य सरकारची त्रिसदस्यीय समिती यांच्यातही वाटाघाटी झाल्या. मात्र त्यातूनही समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप अद्याप सुरूच आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांच्यासोबत संपाबाबत चर्चा केली. 


बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस आहे. गेल्या मंगळवारपासून बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत. संप मिटण्यासाठी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक सोमवारी पार पडली. पण या बैठकीत संप मागे घेण्यासंदर्भात कुठलाही तोडगा निघाला नाही, असे बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. बेस्टचा संप मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीही गेल्या आठवड्यात महापौर बंगल्यावर बैठका घेतल्या होत्या. पण त्यातून तोडगा निघू शकला नाही. त्याचबरोबर हा विषय आता उच्च न्यायालयात गेला असल्याने तिथेही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. संप मागे घेऊन प्रशासनाशी चर्चा का केली नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी कृती समितीला विचारला होता.