BEST च्या कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका मुंबईकरांना; काय आहेत त्यांच्या मागण्या?
BEST Strike Mumbai : मुंबईकरांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या बेस्ट बस सेवेचा खोळंबा झाल्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
BEST Strike Mumbai : मुंबई लोकलला ज्याप्रमाणं लाईफलाईन म्हणून संबोधलं जातं त्याचप्रमाणं शहरातील बस सेवाही नागरिकांचा प्रवास सुकर करते. पण, सध्या हीच बेस्ट बस सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं प्रभावित झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वेमागोमाग मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बेस्ट बसच्या सेवेत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. यामध्ये जवळपास 9 हजार चालक आणि वाहकांनी संपावर जाऊन यंत्रणेला हादरा दिला आहे. 1 ऑगस्टपासून घाटकोपर आगारातील 280 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेत आझाद मैदान गाठलं होतं. ज्यानंतर दिवसागणिक संपाची तीव्रता वाढली आणि या संपात कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला.
मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आगारात न परतण्याची कर्मचाऱ्यांची भूमिका असल्यामुळं याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होताना दिसत आहे. या संपानं आणखी गंभीर वळण घेतल्या मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसेसची संख्या कमी होणार असून, नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार सध्या या संपामध्ये घाटकोपर, मुलुंड, देवनार, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, बॅकबे, प्रतीक्षा नगर, सांताक्रुझ, धारावी, गोराई आणि मजास या आगारांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
बेस्टचे कंत्राटी कर्मचारी सध्या विविध कारणांनी संपावर आहेत. वेतनवाढ ही महत्त्वाची मागणी असून, त्यासोबतच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करणं, बस प्रवास मोफत करण्याची मुभा द्यावी, या आणि अशा इतर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
दरम्यान, एकिकडे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरीही संपकाळात प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत बेस्टकडून काही सुविधाही पुरवण्यात येत आहेत. पण, कर्मचाऱ्यांअभावी बेस्ट कोलमडताना दिसत आहे ही वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain News : पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत, वरुणराजा पुन्हा कधी बरसणार?
अवघ्या 18 हजार रुपयांच्या वेतनात मुलांचं शिक्षण, आजारपण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण असल्याचं म्हणत आम्ही जगायचं तरी कसं असा प्रश्नच हे कंत्राटी कर्मचारी विचारत आहेत. तेव्हा आहा या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा तोडगा नेमका कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.