कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : आर्थिक गर्तेत अडकलेल्या बेस्टने अखेरची धडपड म्हणून भाडेकपातीचा निर्णय घेतला आहे.  बेस्टच्या सध्या बसचं किमान भाडं आठ रूपयांवरून पाच रूपयांवर आणलं आहे. तर एसी बसचं किमान भाडं आता सहा रूपयांवर आणलं आहे. जास्तीत जास्त २० रुपयांत मुंबईत लांब पल्ल्याचा प्रवास करता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी बस खरेदी आणि त्यांची देखभाल खर्चिक असल्यामुळे बसेस भाडेतत्वावर घेऊन चालवण्याचा निर्णय आयुक्त अजोय मेहता यांनी घेतलाय. त्यामुळे खर्चात कपात होईल. सध्या असलेला ३३०० बसेसचा ताफा ७ हजार बसेसपर्यत नेला जाणार आहे. त्यात १ हजार वातानुकूलित बसेस असतील.


बेस्टच्या या निर्णयाचं प्रवाशांनी स्वागत केलं आहे. बेस्टवर सध्या २ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. या कर्जावरील व्याजापोटी महिन्याला २५ कोटी रूपये बँकांना द्यावे लागतात. बेस्टच्या वाहतूक विभागाचं महिन्याचं उत्पन्न आहे ८० ते ९० कोटी रूपये आणि खर्च याच्या दुप्पट म्हणजे १६० कोटी रूपये आहे. 


कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दर महिन्याला तब्बल १३५ कोटी रूपये खर्च होतात, त्यासाठी कर्ज काढावं लागतं. राज्य सरकारला पोषण अधिभारापोटी ३०० कोटी तर निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रँच्यूईटीचे ५०० कोटी रूपये देणं बाकी आहे.


बेस्टच्या या भाडेकपातीमुळे मुंबईतले खासगी वाहतूक करणारे विशेषतः रिक्षा, टॅक्सी, ओला, उबरचालक संकटात सापडणार आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने भाडेवाढीची मागणी केली. 


दर कमी केल्याने मुंबईकर पुन्हा बेस्टकडे वळतील अशी अपेक्षा आहे. तसं खरंच झालं तर मुंबईच्या रस्त्यांवरचा खासगी गाड्यांचा ताणही कमी व्हायला मदत होईल यात शंकाच नाही. मात्र बेस्टने संकटातून बाहेर येण्यासाठी केलेली ही उपाययोजना त्यांच्यासाठी बुमरँग ठरू नये हीच अपेक्षा.