भाई ठाकूर टोळीचा हस्तक जेरबंद; १५ वर्षे होता फरार
आरोपी (चंदूमामा) सतत नाव बदलून परराज्यात राहात असे.
मुंबई: हत्या, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे असलेल्या तसेच, वडराई येथे १९९१मध्ये घडलेल्या चांदीची बोट लूट प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट -११च्या पोलिसांनी ही कारवाई केली. चंद्रकांत अण्णा पाटील उर्फ चंदूमामा उर्फ चरण पालेकर (वय ६६) असे आरोपीचे नाव आहे. गेली १५ वर्षे तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते, पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्याच. भाई ठाकूर टोळीशी तो संबंधीत होता.
छोटा राजन टोळीशी संधान बांधून हत्या
आपली खरी ओळख लपवून परराज्यात राहणारा हा सराईत आरोपी अधूनमधून मुंबईत येत असे. त्याच्या येण्याजाण्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाळत ठेऊन त्याला अटक केली. साधारण ९०च्या दशकात आरोपी हा भाई ठाकूर टोळीशी संबंधीत होता. त्यांने छोटा राजनच्या साथिदारांना सोबत घेऊन २००३मध्ये राजेंद्र पतंगे यांची हत्या केली होती. ही हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आली होती. या प्रकरणात ९ जणांना अटकही झाली होती. मात्र, सदर आरोपी (चंदूमामा) सतत नाव बदलून परराज्यात राहात असे. त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता. पण, अधूनमधून तो मुंबईत येत असे. याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच पोलीस त्याच्यावर बारीक नजर ठेऊन होते.
दाऊदच्या हस्ताकासाठीही काम
दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चंदूमामाला बोरिवली परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसानी केलेल्या चौकशीत त्याने राजेंद्र पतंगे यांच्या हत्येची कबुली दिली. महत्त्वाचे असे की, यापूर्वी त्याला १९९७मध्ये अटक झाली होती. मात्र, जामिनावर सुटलेला चंदूमामा कारागृहाकडे परतलाच नव्हता. त्याने थेट दिल्लीला पळ काढला आणि तो एकेकाळी दाऊद टोळीसाठी कमा करत असलेल्या सुभाषसिंग ठाकूरसाठी काम करू लागला. एका शस्त्रसाठा प्रकरणात त्याला टाडाखाली १० वर्षांची शिक्षाही झाली होती. अनेक गंभीर गुन्हांमध्ये तो पोलिसांना हवा होता.