मुंबईच्या लोकलमध्ये होणार `हा` मोठा बदल, मोजावे लागणार जास्तीचे पैसे
रेल्वे व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठवला आहे
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईची लोकलसेवा हळुहळू पूर्ववत होत आहे. दोन डोस झालेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवासाचा मुभा देण्यात आली आहे. अशातच मुंबईकरांसाठी लवकरच हायब्रीड लोकल धावण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी सुरु झाली आहे.
मुंबई लोकलमधला फर्स्ट क्लासचा डबा आता इतिहास जमा होणार असून त्याची जागा एसी कोच घेणार आहे. तशी प्रक्रियाही सुरु झाली आहे. मुंबईच्या लोकल सेवेत मोठा गाजावाजा करत एसी लोकल दाखल झाली. मात्र मुंबईकरांचा म्हणावा तसा एसी लोकलला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रेल्वेला मोठा तोटा सहन करावा लागला.
यानंतर रेल्वेन नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. यात संपूर्ण एसी लोकल न चालवता सामान्य लोकलमध्येच एसीचे डबे जोडण्याची मागणी पुढे आली आहे. सुमारे 60 टक्के लोकांनी अशी मागणी केली आहे. 15 डब्यांच्या लोकलमध्ये 8 डबे सेकंड क्लास आणि 6 एसी कोच असावेत, किंवा, 12 डबे सेकंड क्लास आणि 3 डबे एसी कोच असावेत असं नागरिकांचं म्हणणं आहे.
नागरिकांची ही मागणी रेल्वेने प्रस्ताव बनवून मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र, एसी प्रवासासाठी फर्स्ट क्लास पेक्षा सुमारे 30 टक्के जास्त मोबदला मोजावा लागणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर हायब्रीड लोकल धावेल. या हायब्रीड लोकलमध्ये फर्स्टक्लासचा डब्बा नसणार आहे.