दीपक भातूसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तज्ज्ञांनी ऑक्टोबरपर्यंत राज्यात तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात औषध आणि कोरोना साहित्याची खरेदी करणार आहे. कोरनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग ५५० कोटी रुपयांची खरेदी करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यात रेमडिसेव्हिर, टॉसिलिझुमाब या इंजेक्शनसह विविध प्रकारची औषधे, मास्क, पीपीई किट यांचा समावेश आहे. याबाबतचा जीआर आज राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रेमडिसेव्हिर आणि टॉसिलिझुमाब या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. ही इजेक्शन्स खरेदी करण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल झाले होते. ही बाब लक्षात घेता ही इजेक्शन्स तिसऱ्या लाटेपूर्वीच खरेदी केली जाणार आहेत.


कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग करणार मोठ्या प्रमाणात औषधांची खरेदी
- यात रेमडिसेव्हिर इंजेक्शन्स - २ लाख ५० हजार 
- टॉसिलिझुमाब इंजेक्शन्स - १० हजार 
- पॅरॅसिटॉमल गोळ्या - १ कोटी ५० लाख 
- ऑक्सिजन मास्क - ५० हजार 
- आरटीपीसीआर टेस्ट किट - ३ कोटी 
- रॅपिड अँटिजन टेस्ट किट - ८७ लाख ५० हजार 
- ट्रिपल लेअर मास्क - १ कोटी ५० लाख 
- N95 मास्क - १ कोटी ३२ लाख ५० हजार
- पीपीई किट - १ कोटी ३२ लाख ५० हजार
- डेड बॉडी सूट - १ लाख २५ हजार


नीती आयोगाचाही तिसऱ्या लाटेचा इशारा
देशात कोरोनाची तिसरी लाट मोठी असेल असा इशारा नीती आयोगानेही केंद्र सरकारला दिला आहे. तिसऱ्या लाटेत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत आढळून येऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला किमान २ लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, असं नीती आयोगाने केंद्र सरकारला कळवलं आहे. 


नीती आयोगाने गेल्या वर्षी सप्टेंबरपूर्वी २०२० मध्ये दुसऱ्या लाटेआधी अंदाज व्यक्त केला होता. दुसऱ्या लाटेत गंभीर आणि मध्यम लक्षणं असणाऱ्या २० टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं, असं त्या अंदाजात म्हटलं होता.