मोठी बातमी: मुंबई पोलीस सुशांतसिंह प्रकरणाचा समांतर तपास करणार नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
दीपक भातुसे, झी मराठी, मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआय करणार आहे. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार असून मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा समांतर तपास करणार नाही.
मुंबई पोलीस आणि राज्य सरकार सीबीआयला या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सुपूर्द करणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काल राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वागत केलं होतं आणि सीबीआयला सर्व सहकार्य केलं जाईल असं सांगितलं जातं आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलंय. मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं. तसंच सर्वाच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.