मुंबई : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सर्वच पक्षांनी आपण किती जागा जिंकणार याचे तर्कवितर्क लावत आहेत. राज्यात विधानपरिषद निवडणुक जाहीर झाली असतांना आता राजकीय पक्षांनी आपले फासे फेकायला सुरुवात केली आहे. अपक्षांसह भाजपकडे असलेलं संख्याबळ लक्षात घेता भाजपचे ४ उमेदवार सहज विजयी होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषद निवडणुकीतील सुत्रानुसार उमेदवाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपच्या १०५ आमदारांबरोबर १४ अपक्ष बरोबर असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. तसंच ही निवडणुक बिनविरोध होईल असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.



निवडणूक बिनविरोध ?


विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर उर्वरित आठ जागांवर कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. ११ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या प्रमुख चार पक्षांकडून कुणाला उमेदवारी मिळते हे स्पष्ट होईल. 


नऊ पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे १४ मे रोजी म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. ९ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिले तर २१ मे रोजी निवडणूक अटळ असेल. कोरोनामुळे राजकीय पक्ष ही निवडणूक बिनविरोध करतील का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.