शिवसेना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र, निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - संजय राऊत
Shiv Sena MLA Disqualification Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठित खंजीर खुपसला असून नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितल.
Shiv Sena MLA Disqualification Hearing : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इतिहासजमा झाली आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) संपवण्याचा भाजपाचा हा कट आहे. हे त्यांच जुनं स्वप्न होतं. पण शिवसेना अशी संपणार नाही, शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आहे. आजचा निकाल हा अंतिम निर्णय नाहीए, हे केवळ षडयंत्र आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इतिहास लिहिण्याची संधी मिळाली होती. पण त्यांनी ही संधी घालवली आहे. नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला आहे. नार्वेकर यांचा निर्णय हा मॅच फिक्सिंग असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. या निकालाुळे जे आता टाळ्या पिटत आहेत किंवा फटाके वाजवत आहेत, ते सर्व गद्दार आणि बेईमान आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.
प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, श्रीराम आपले वडिल दशरथ यांच्यासाठी वनवासात गेले. पण या लोकांनी राजनैतिक वडिल बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच वनवासात पाठवली आहे भाजपचे गुलाम होऊ अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. 60 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली, त्या पक्षाची मालकी भाजपने नेमलेली एक व्यक्ती ठरवणार का? दिल्लीच्या आदेशावर काम करणारा व्यक्ती शिवसेनेचं भविष्य ठरवणार का? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. जनताच याचा निकाल करेल.
आमचं आव्हान आहे निवडणुका घ्या, निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार आहेत. भरत गोगावले यांचं व्हीप बेकायदेशीर आहे. सुनील प्रभू यांचाच व्हिप खरा आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही लढाई लढू विधानसभा अध्यक्ष किती खोटे आहेत हे सिद्ध करु असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमचा जीव गेला तरी आम्ही शिवसेनेसाठी लढत राहाणार असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.