दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात केवळ बळीराजाच नव्हे तर, संपूर्ण राज्यात नाराजीचा तीव्र सूर उमटू लागला आहे. त्यामुळे सरकारच्या गोटातही अस्वस्थता पसरली असून, या मुद्द्यावर 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे.


विविध मुद्द्यांवर खलबतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी, जनतेमध्ये सरकारविरोधी वाढू लागलेली नाराजी, विरोधकांचे आव्हान, हिवाळी अधिवेशन आदी मुद्दे चर्चेला येण्याची शक्यता असून, या मुद्द्यांवर रणनितीही आखली जाणार आहे.


बैठकीत कोणाचा समावेश?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहणार आहेत.


नारायणास्त्रावर चर्चा?


 दरम्यान, राज्याच्या विविध स्तरातून व्यक्त होणारी नाराजी दूर करण्याबाबत प्रामुख्याने ही बैठक आयोजित करण्यात आली असली तरी, सध्या राज्याचे राजकारण ढवळून टाकलेला विषयही चर्चेत येण्याची शक्यता आहे. अर्थातच या बैठकीत कॉंग्रेसमधून बाहेर पडून स्वपक्षाची स्थापना केलेल्या नारायण राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


मित्रपक्षाच्या भूमिकेवरही चाचपणी


महत्त्वाचे असे की, नारायण राणे यांना मंत्रिमंडलात स्थान दिल्यास मित्रपक्ष शिवसेनेची भूमिका काय असू शकते यावरही या बैठकीच चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, या चर्चेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.