अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत संविधान बचाव रॅलीच्या बॅनरखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्या प्रजासत्तादिनी सर्व विरोधी पक्ष मिळून मुंबईत संविधान बचाव रॅली काढणार आहेत. १५ दिवसांपूर्वी विरोधकांनी या रॅलीची घोषणा केल्यानंतर भाजपानेही या रॅलीला उत्तर देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे. उद्या मुंबईत या दोन्ही रॅलीने राजकीय वातावरण मात्र तापणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची घटना बदलण्याबाबत नरेंद्र मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी देशभर रान पेटवलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हा मुद्दा गाजल्यानंतर आता विरोधकांनी हाच मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. काही विद्यार्थ्यांनी देशात यापूर्वी संविधान बचाव रॅलीचे ठिकठिकाणी आयोजन केलं होतं. आता विद्यार्थ्यांची ही चळवळ मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी घेतलं आहे. यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतलाय. या संविधान रॅलीत देशातील विरोधी पक्षाचे बहुतांश बडे नेते सहभागी होणार आहेत. 


यात राजू शेट्टी यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जनता दलचे नेते शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, लोक भारतीचे कपिल पाटील, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार आदी सहभागी होणार आहेत. ही संविधान बचाव रॅली मंत्रालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपणार आहे.


एकीकडे विरोधकांनी संविधान बचाव रॅलीची तयारी केली असतानाच दुसरीकडे भाजपाही या रॅलीला उत्तर देणार आहे. यासाठी प्रजासत्ताक दिनीच तिरंगा रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. चैत्यभूमी येथून सुरू होणारी ही तिरंगा रॅली एलफिस्टन येथील कामगार मैदानावर संपणार आहे. 


 याशिवाय विरोधक आणि भाजपा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची रॅली काढणार आहे. विरोधकांच्या मुंबईतील संविधान बचाव रॅलीची सांगता गेट वे ऑफ इंडियावर होणार असली तरी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियाने या यात्रेला परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी मुशायऱ्याचा कार्यक्रम असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आलंय. मात्र तरीही गेट वे ऑफ इंडियावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणारच अशी भूमिका विरोधकांनी घेतलीय. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी मुंबईत विरोधकांविरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.