मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आवरावी, असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 


हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


अमोल मिटकरी व्यासपीठावरून पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असं लक्ष्य करणं शोभत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लावून समाजाचे तुकडे करण्यात रस आहे असं दिसतं.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिंदू पुरोहितांची जाहीर टिंगल करत असले तरी त्यांना अन्य कोणत्या समाजघटकाबद्दलही आस्था नाही. महाराष्ट्रात १९९९ ते २०१४ अशी पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि २०१९ साली मतदारांचा विश्वासघात करून सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवलं. 


याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं. दलित-आदिवासींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीनेच केला. पुरोगामीत्वाचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात विविध सामाजिक वर्गांतील दुर्बल घटकांना लक्ष्य करून आपली मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पद्धती ताज्या घटनेत दिसली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.