Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मोहित कंबोज यांना क्लिनचिट दिली आहे. तपासात कंबोज यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त असताना मोहित कंबोज यांच्यावर फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. कंबोज यांनी थेट संजय पांडे यांच्या आर्थिक घोटाळ्यांना आव्हान दिले होते. त्यानंतर मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कंबोज यांना मुंबई पोलिसांकडून क्लिनचिट मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक गुन्हे शाखेने  गुरुवारी भाजप नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला फसवणूकीचा गुन्हा बंद केल्याची माहिती दिली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या आणि प्रसाद लाड या तीन भाजप नेत्यांविरुद्धचे खटलेही बंद केले होते. त्यामुळे एकाच महिन्यात चार भाजप नेत्यांना मुंबई पोलिसांकडून क्लिनचिट मिळाली आहे.


नेमकं प्रकरण काय?


कंबोज आणि एका कंपनीच्या अन्य दोन संचालकांनी 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ते ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा वापर झाला नसल्याची तक्रार एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे, एमआरए मार्ग पोलिसांनी कंबोज आणि कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 409 (गुन्हेगारी विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. 


मुंबई महापालिकेचीही नोटीस


यापूर्वी, मार्चमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंबोज राहत असलेल्या सांताक्रूझमधील इमारतीला नोटीस बजावली होती. यामध्ये मोहित कंबोज यांचा फ्लॅट होता. यामध्ये काही बेकायदेशीर बदल झाला आहे का, याची खातरजमा करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने इमारतीचीही पाहणी केली. तेव्हाही आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कंबोज यांनी केला होता.