मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भाजपकडून महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा पुढे आणला जाणार आहे. आज सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त विधानसभा आणि विधानपरिषदेत भाजपकडून सावरकरांचा गौरव करणारा ठराव मांडला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठरावाला निश्चितच काँग्रेसकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेची या मुद्यावरून कोंडी होऊ शकते. महाविकास आघाडीतील ही वैचारिक दुफळी समोर आणण्यासाठी आणि शिवसेनेसमोर अडचण करण्यासाठी भाजप ही खेळी खेळणार आहे. 



भाजपच्या या खेळीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसं उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या मुद्यावर अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशीही भाजप आक्रमक राहणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. ३ महिन्यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकार जनतेला किती दिलासा देणार हे या अर्थसंकल्पातून समोर येईल.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावरुन महाविकासआघाडीमध्ये बिनसण्याची शक्यता आहे.