मुंबई: देशातील काहीजणांना राममंदिर बांधून कोरोना जाईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणी करणाऱ्या शरद पवार यांना भाजपकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, हो ना… तीन लाख रूग्ण व ११ हजार मृत्यू होऊनही घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे करोना बरा होणार आहे!, रूग्णांची हेळसांड व रूग्णालये लुटत असताना भांडणाऱ्या तिघाडी सरकारमुळे बरा होणार आहे!!, गरीबांसाठी एकही रूपयांची मदत जाहीर न केलेल्या नेतृत्वहीन सरकारमुळे बरा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला


तत्पूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली. राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न शरद पवार उपस्थित करतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरात जाऊन कोरोना नष्ट कर, असे गाऱ्हाणे विठुरायासमोर का मांडले, असा प्रतिप्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. 


मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर

मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये भाष्य केले. त्यांनी म्हटले की, करोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, असे पवार यांनी म्हटले होते.