`मोदींचं अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राहुल गांधींच्या माफीची मागणी`
मोदी सरकारने चीनपुढे शरणागती पत्कारली, असा संदेश लोकांमध्ये गेला आहे. हे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या नेत्यांचा आटापिटा सुरु आहे.
मुंबई: गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेनंतर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राहुल गांधी व त्यांच्या पक्षाने सैन्याची आणि संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली होती. या टीकेला आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, हे काँग्रेसला कळत नाही का?'
राहुल गांधींनी माफी मागावी ही भाजपच्या नेत्यांची मागणी अत्यंत हास्यास्पद आहे. मोदी सरकारने चीनपुढे शरणागती पत्कारली, असा संदेश लोकांमध्ये गेला आहे. हे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या नेत्यांचा आटापिटा सुरु आहे. पाकिस्तान, नेपाळ किंवा चीनबाबतची मोदी सरकारची परराष्ट्र निती पूर्णपणे फोल ठरली आहे. ही गोष्ट लोकांना कळू नये, त्यासाठी भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला.
'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार
मुळात राहुल गांधी यांनी माफी कशासाठी मागावी? भारताचे २० जवान शहीद झाले, ८५ जवान जखमी झाले. १० सैनिकांना अटक केली. गेल्या दोन महिन्यांपासून चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आहेत. हे सगळे सुरु असताना प्रधानसेवक झोपले का होते, याचा जाब विचारला म्हणून तुम्ही राहुल गांधींना माफी मागायला सांगता. भाजपला हा गुन्हा वाटत असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते शंभरदा हा गुन्हा करायला तयार आहेत. सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणे, ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. राहुल गांधी हे काम करतच राहतील, असे सचिन सावंत यांनी ठणकावून सांगितले.