मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी म्हटले की, महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने स्पष्ट जनादेश दिला आहे. त्यामुळे महायुतीनेच सरकार स्थापन करावे, अशी जनतेची इच्छा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा करायला गेलो होतो. यावेळी आम्ही त्यांना राज्यातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांच्याकडून कायदेशीर पर्याय जाणून घेतले. आता या चर्चेआधारे भाजप आपला पुढचा निर्णय घेईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाची स्थिती अजूनही कायम आहे. 



'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच'


तत्पूर्वी आज मुंबईत शिवसेना आमदारांचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपविषयीची भूमिका स्पष्ट केल्याचे समजते. आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहायचे, असे उद्धव यांनी सांगितले. 



भाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी


या बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सर्व आमदारांना मोबाईल फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आणखी दोन दिवस मुंबईतच थांबण्यास सांगितले आहे. आता थोड्याचवेळात वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची आणखी एक बैठक होणार आहे.